top of page
IMG_1162.PNG

(संबंधित सर्व नाटकांचे पहिले अंक उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांना पूर्ण संहिता हवी असेल त्यांनी नमूद पत्त्यावर संपर्क साधावा. केवळ आनंदासाठी ज्यांना हे लेखन वाचायचे आहे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया माझ्या मेलवर जरूर पाठवाव्या अशी विनंती आहे.)

शेवंता जित्ती हाय!

​महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करत असलेल्या एका भोळ्या भाबड्या 'माणसा'ला चालू ट्रेनमधील एका प्रसाधनगृहात 'शेवंता जित्ती हाय' हे वाक्य लिहिलेले दिसते. त्या वाक्यामुळे त्याचे कुतूहल चाळवले जाते.त्या अनुषंगाने विचार करत असताना एक हतबल-असहाय बाई मदतीसाठी आपल्याला हाक मारत आहे असे त्याला वाटू लागते. मग तो एका अंतरिक प्रेरणेने शेवंता नक्की कोण, कुठली, तिचे काय झाले असेल याचा शोध घेण्याचा निर्धार करतो. त्यासाठी चौकटबद्ध शासनयंत्रणा आणि सुस्त समाजव्यवस्था यांच्याशी झुंज देत शेवटी तो शेवंताचे रहस्य आणि त्याबरोबरच नव्या युगातील माणसाच्या अभ्युदयाची आशा असणारे प्रेम आणि विवेकाचे मूल्य जगासमोर उजागर करतो.

ऑपरेशन दगड

एका सुदूर डोंगराळ भागातील एका गावाच्या वाटेवर एक भला मोठा दगड येऊन कोसळतो आणि त्या गावाची शहरात जाणारी एकुलती एक वाट बंद होते…तो दगड हलवण्यासाठी गावकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी काय काय ‘उद्योग’ करतात (किंवा करायचे टाळतात) याचे विदारक दर्शन घडवणारी ही गोष्ट आहे. ‘स्वातंत्र्य’ हे माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचे मूल्य आहे. या मूल्याचे उद्गान करणारे हे नाटक‌ आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मूर्ख ठरवून त्यांच्यावर अनिर्बंधपणे राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या बेबंद सत्ताधीशांचा आणि संवेदनाहीन नोकरशाहीचा खरा चेहरा ते लोकांसमोर आणते. इतकेच नाही तर जुलूम-जबरदस्ती सहन करणाऱ्या, भोळ्याभाबड्या, निष्पाप जनतेचे कष्टप्रद जीणे लोकांसमोर आणत ते त्यांना अन्यायाच्या विरोधात सकारात्मक आवाज उठवण्याची प्रेरणाही देते.

घराकडे अपुल्या

विक्रम आणि शर्वरी हे बालमित्र. उच्च विद्या विभूषित आणि संवेदनशील मनाचे नव्या युगाचे तरुण प्रतिनिधी. परदेशात नोकरीला असणारा विक्रम शर्वरीला भेटण्यासाठी भारतात येतो. तिच्या आईचे निधन झाल्यामुळे तिचे सांत्वन करावे हा त्याचा हेतू असतो. शर्वरीच्या आईचे क्रियाकर्म झाल्यावर मनाला थोडा दिलासा म्हणून ते एका किल्ल्यावर फिरण्यासाठी जातात. तेथे त्यांना गावातील शिवा आणि पार्वती तसेच बाज्या आणि गंगी ही दोन जोडपी भेटतात. गडावर जाता जाता त्यांच्यात जी चर्चा होते त्यातून नव्या पिढीचे प्रश्न काय आहेत आणि त्यांची सोडवणूक गावठी शहाणपणाने (Native Intelligence) कशी होऊ शकते याचा उलगडा होतो. एकूणच संभ्रमित अवस्थेत जगत असणाऱ्या नव्या पिढीला आपल्या मुळांची आणि जबाबदारीची आठवण करून देणारी, आणि आपण भारतीय आहोत याचा अभिमान वाटायला लावणारी प्रत्ययकारी गोष्ट !

शेक्सपिअर गेला उडत

प्रत्येक लेखक हा आपापल्या भाषेतच मोठा असतो हे  लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर तुकारामांनी काही इंग्रजीत लिहिलं नाही, तरी ते जगातील  सर्वात मोठे लेखक ठरलेच ना? आपली माती, आपली मुळं हीच शेवटी  महत्त्वाची! कोण तो शेक्सपिअर; खरा की खोटा? एक की दोन? स्त्री की पुरूष? नाटककार की कवी? काय करायचंय आपल्याला? आम्हाला आमच्या मातीतला, आमचा, खराखुरा, हाडामासाचा लेखक हवाय, उठा बाबा... उठा! मनात  आणलंत तर तुम्ही शेक्सपिअरपेक्षा चांगलं नाटक लिहू शकाल. गेला उडत तो शेक्सपिअर!

जरा हळू!

आजकाल माणूस एका दुष्टचक्रात अडकल्यासारखा भिरभिरत आहे. एका अनामिक गतीने आणि भीतीने त्याच्यावर जणू एक जाळे टाकलेले आहे. त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. सतत पुढे जायचे आहे पण नेमके कुठे जायचे आहे ते कळत नाही. तसे पाहता मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरे छोट्या छोट्या गोष्टीत असतात आणि त्या अगदी आपल्या अवतीभवतीच असतात. फक्त त्या जाणून घेण्याइतकी संवेदना आपल्याकडे जिवंत असली पाहिजे. एकदा ती ओल जाणवली, एकदाका तो सूर गवसला की मग जगणे किती सुंदर होऊन जाते! याचा अनुभव देणारे एक बोचरे तरी तितकेच गोड नाटक!

अंबे गोंधळाला ये...

मुंबईत एका टॉवरच्या बांधकामावर काम करणाऱ्या एका मजुराची; सुजाता नावाची आठ वर्षे वयाची मुलगी अचानक नाहीशी होते. तेथे शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारी एक सोशलवर्कर तरूणी (अंजली) सुजाताचा शोध घेऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करू लागते. त्यासाठी तिला पोलीस-यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांशी कसा संघर्ष करावा लागतो, त्यात ती यशस्वी होते की नाही, सुजाताचे पुढे काय होते, याचा पट मांडणारी अभूतपूर्व, रहस्यरंजक,आणि प्रेरक कहाणी!

लेडीज् सायकल

माणसाचं जीवन किती गुंतागुंतीचा असतं आणि त्याला सामोरे जाताना कोणकोणत्या भावभावनांचा सामना करावा लागतो याचा प्रत्यय देणारे हे अतिशय संवेदनशील आणि उत्कंठावर्धक नाटक. माणसाचे सारे आयुष्य जणू कवेत घेऊ पाहणारी ही कथा आहे. प्रभा सरदेसाई नावाची एकटी बाई हे नाटक सादर करत आहे. बाकीच्या पात्रांचे फक्त आवाज आहेत. तिला दिलेले संवाद क्रमाने तिच्या लक्षात राहावे म्हणून तिच्या संवादात परिच्छेद पाडले आहेत. त्यामुळे तिला पुढील बोलण्याचा संदर्भ आणि विश्रांतीही मिळावी अशी धारणा आहे. आपण आपल्या जगण्याची एक गोष्ट रचत असतो पण त्याच वेळी जीवनही आपल्यासाठी त्याची एक वेगळी अशी गोष्ट लिहीत असते… यातील कोणती गोष्ट आपली?

डोन्ट वरी बी हॅपी...

'डोन्ट वरी बी हॅपी’ हे सायबर क्राईमच्या संकटाची जाणीव करून देणारे मराठीतील पहिले नाटक असावे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे (मुंबई) २०१४ मध्ये या नाटकास उत्कृष्ट लेखनाचे (तृतीय क्रमांक) पारितोषिक देण्यात आले. नावीन्यपूर्ण कथानक, गतिमान मांडणी, संस्मरणीय पात्रे, अर्थवाही संवाद, आणि तशाच सृजनशील तांत्रिक बाजूंमुळे या नाटकाचा प्रयोग आजही रंगतदार आणि प्रेरक होत असतो. ‘बदलता काळ माणसासमोर अनेक आव्हाने उभी करत असतो; अशा आव्हानांना सामोरे जाण्यातच त्याच्या यशाचे गमक दडलेले असते.’ नाटकाचे हे सशक्त मध्यवर्ती सूत्र लेखक-कवी-कलावंतांना आपल्या आविष्कारासाठी कायम आव्हान देत असते. या पार्श्वभूमीवर आणखी काही समकालीन संदर्भांसह हा विषय नव्याने मांडायचा झाल्यास टेलीफिल्म, चित्रपट, वेब-सिरीज, दूरचित्र-मालिका, अशा अन्य माध्यमातूनही तो रसिकांच्या मनावर मोहिनी घालू शकतो हे उघडच आहे.

याचक

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर याचक म्हणून गेलेला नाथा हा भिकारी शेवटी मुख्यमंत्र्यांनाच याचक होणे भाग पाडतो. या कथासूत्राचे मार्मिक आणि भेदक दर्शन घडवणारे आगळे-वेगळे नाटक! मानवी मनाच्या संवेदना जाग्या करत, ‘स्टिंग-ऑपरेशन’च्या सहाय्याने एक भयंकर सत्य उजेडात आणणारे हे मराठीतील पहिले नाटक ठरावे. समाजजीवन, राजकारण, पत्रकारिता यावरही भाष्य करत ते साऱ्यांनाच अंतर्मुख करते आणि एक नवी जीवनसृष्टी देऊन जाते.

१०

भूमिका

"All the world's a stage, and all the men and women merely players. They have their exits and their entrances; and one man in his time plays many parts." हे शेक्सपियरचे वचन जगप्रसिद्ध आहे जगातील अनेक नाटकारांचा प्रवास या 'वेद-वाक्या'पासून सुरू झाला आहे; तसाच तो माझाही झाला... दोन तरुण आणि त्यांच्या आयुष्यात आलेली एक तरुणी अशी केवळ तीन पात्रे असणाऱ्या आणि एकाच सेटवर घडणाऱ्या या नाटकाने आजवर अनेक रंगकर्मींना मोहिनी घातली आहे. साधी सोपी कथा आणि सुंदर संवाद असणारे हे नाटक दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशा साऱ्याच क्षेत्रातील प्रतिभेला मुक्त वाव देणारे ठरले आहे! चला तर — Show must go on…

११

हिरण्यगर्भ 

आंतरजातीय विवाह हा तसा अतिशय संवेदनशील आणि तितकाच स्फोटक विषय! या नाटकात तो अतिशय तरलपणे आणि जबाबदारीने मांडला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या नाटकाला १९९५-९६ मध्ये झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेतील लेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर याच या नाटकाला १९९८-९९ मध्ये वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कारातील उत्कृष्ट नाटकासाठीचा विशेष पुरस्कार देण्यात आला. "प्रेम म्हणजे माणसाच्या संस्कृतीचा सारांश आणि त्याच्या अभ्युदयाची आशा- एकमेव!" असे कुसुमाग्रजांनी म्हटले आहे. त्यांचा हा संदेश कवितेच्या पुस्तकातून बाहेर पडून येथे नाटकाच्या रूपात समोर आलेला दिसतो.

bottom of page