रसिकहो,
जगभरातील रसिकांना, माझ्या चाहत्यांना, रंगकर्मींना माझी नाटके/एकांकिका आणि अन्य निवडक साहित्य एकत्रितपणे उपलब्ध करून देणे हा या वेबसाईटचा उद्देश आहे. राज्य नाट्यस्पर्धा, इतर विविध स्पर्धा/महोत्सव, हौशी व्यावसायिक नाट्य-निर्मिती आणि अशाच अन्य कारणांसाठी नाटक/एकांकिका आणि अन्य साहित्याच्या शोधात असणाऱ्यांना, होतकरू लेखकांना, अभ्यासकांना या साहित्याचा उपयोग होतो असा अनुभव आहे.
माझ्या कविता हे अनेकांसाठी सरप्राईज आहे कारण एखादा अपवाद वगळता त्या कधीही कोठेही प्रसिद्ध झालेल्या नाहीत. खरे सांगायचे तर लोक मला कवी म्हणून ओळखण्यापेक्षा नाटककार आणि ललित लेखक म्हणूनच अधिक ओळखतात, असो!
माझी संकल्पित नाटके, एकांकिका आणि अन्य साहित्य जसजसे पूर्ण होत जाईल तसतसे ते रसिकांच्या माहितीसाठी मी येथे समाविष्ट करत राहणार आहे.
येथील बहुतेक नाटके आणि एकांकिकांना महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.सर्व चित्रपटकथाही ‘स्क्रीन रायटर्स असोसिएशन’कडे रितसर नोंदवलेल्या आहेत. सर्व हक्क लेखकाकडे राखीव आहेत. या साहित्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यावी, सहकार्य करावे अशी विनंती आहे.
हे साहित्य तुम्हाला आनंद देत राहील अशी मला खात्री आहे.
पुन्हा पुन्हा भेटत राहूया.
शुभेच्छा!


नवीन चित्रपट कथा
+91 9920077626 | pralhadjadhav.one@gmail.com | pralhadjadhav.two@gmail.com
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत

परिचय
प्रल्हाद दत्तात्रय जाधव
२५.१०.१९५६
एम्. ए., बी.जे.
भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत
छंद: वाचन, लेखन, जंगलभ्रमण, गिरीभ्रमण, गिर्यारोहण, पक्षीनिरीक्षण
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून संचालक म्हणून निवृत्त.तीस वर्षांच्या शासकीय नोकरीत अनेक जाहिराती, जिंगल, गाणी, पथनाट्ये, माहितीपटांचे लेखन/दिग्दर्शन. तसेच विविध नियतकालिकातून, वेधक आणि मोजके ललित लेखन. निवृत्तीनंतरही लेखन वाचन भ्रमंती अशा उपक्रमात कृतिशील सहभाग. (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प सपत्नीक पूर्ण.) महाराष्ट्र आणि देशात विविध ठिकाणी भ्रमंती. नामांकित व्यक्ती आणि संस्थांशी जगणे समृद्ध करणारे स्नेहबंध.
पुरस्कार:
माझ्या 'यमक' या नाट्यसंहितेस १९९०-९१ मध्ये संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात लेखनाचा राज्य पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
'भूमिका' या नाटकासाठी (चेतश्री प्रकाशन) महाराष्ट्र राज्य शासनाचा १९८९- ९० चा प्रौढ वाङ्मय विभागातील उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला.
'शेवंता जित्ती हाय' या नाटकाला १९९३-९४ साली नाटक विभागातील राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला. याच नाटकाला सन १९९१-९२ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लेखनासाठी असलेले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
'पाण्यातले दिवस' या 'राजहंस' प्रकाशित पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा, उत्कृष्ट ललित गद्याचा (प्रौढ वाङ्मय- १९९४-९५) पुरस्कार मिळाला.
'हिरण्यगर्भ' या नाटकाला १९९८-९९ मध्ये वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कारात उत्कृष्ट नाटकासाठीचा विशेष पुरस्कार देण्यात आला. याच नाटकाला १९९५-९६ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेतील लेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात आले होते.
१९९८-९९ मध्ये 'एक कप चहासाठी' या राज्य नाट्य महोत्सवात सादर झालेल्या नाटकाला सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांस्कृतिक कार्य संचालनाला- तर्फे देण्यात आले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे २०१४ मध्ये माझ्या 'डोन्ट वरी बी हॅपी' या नाटकास उत्कृष्ट लेखनाचे (तृतीय क्रमांक) पारितोषिक देण्यात आले.
‘चेटूक’ हे क्लोनिंगवरील, ‘याचक’ हे स्टिंग ऑपरेशनवरील आणि डोन्ट वरी बी हॅपी हे सायबर क्राईमवरील मराठीतील पहिले नाटक असावे अशी माझी धारणा आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या नाटकातही मी ‘डीएनए’च्या मुद्द्याला हलकासा स्पर्श केला आहे.
माझे अन्य बरेचसे साहित्य या वेबसाईटवर मी उपलब्ध करून देऊ शकलो नाही. अशा साहित्यातील एखादे नाटक, एकांकिका, कविता, लेख कोणाला हवा असेल आणि तसे त्यांनी मला कळवले तर मी त्याचा शोध घेऊन ते त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन.